रविवारी (18 एप्रिल) सायंकाळच्या आकड्यानुसार जिल्ह्यात सध्या 19 हजार 905 जण कोरोनाबाधित उपचार घेत असून, आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या एकूण एक लाख 36 हजार 129 रुग्णांपैकी एक लाख 14 हजार 642 जण कोरोनातून बरे झाले आहेत.
अहमदनगर/प्रतिनिधीः नगर जिल्ह्यात कोरोनामुळे रोज सुमारे 40 जणांचे मृत्यू होत आहेत व ही आकडेवारी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. अर्थात महापालिकेकडे असलेल्या नोंदीचा आधार घेऊन त्यांनी ही आकडेवारी दिली असली, तरी रोजचे 40 मृत्यू म्हणजे नगर जिल्ह्यात कोरोनाची अत्यंत भयानक व भयाण स्थिती असल्याचे दाखवणारी आहे. अमरधाममधील अंत्यसंस्कार सहायक मंडळाचे सदस्य रोज 40च्यावर अंत्यसंस्कार करून अगदी वैतागून गेले आहेत. शासनासह प्रशासनाने मृत्यूंची संख्या कमी होण्यासाठी गंभीर पावले उचलण्याची वेळ आली आहे.
रविवारी (18 एप्रिल) सायंकाळच्या आकड्यानुसार जिल्ह्यात सध्या 19 हजार 905 जण कोरोनाबाधित उपचार घेत असून, आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या एकूण एक लाख 36 हजार 129 रुग्णांपैकी एक लाख 14 हजार 642 जण कोरोनातून बरे झाले आहेत. ही आकडेवारी दिलासा देणारा असली, तरी याच आकडेवारीतील आतापर्यंतच्या मृतांच्या एक हजार 582 या संख्येनंतरच मृत्यूंच्या नेमक्या आकड्यांचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडून झाले आहे. शनिवारी (17 एप्रिल) आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या एक हजार 480 होती व ती एका दिवसात 102 ने वाढून सोमवारी सायंकाळी एक हजार 582 झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली.
एका दिवसातील 102 मृत्यूंचा आकडा सोशल मीडियातूनही व्हायरल झाला. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तातडीने खुलासा केला व शनिवार सायंकाळ ते रविवार सायंकाळपर्यंतच्या 24 तासात 39जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. अर्थात त्यांची ही आकडेवारीही अंशतःच खरी होती. त्यांचे हे आकडे रविवारी रात्री आठ पर्यंतचेच होते. त्यानंतरही अमरधाममध्ये मध्यरात्रीपर्यंत आणखी नऊ मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्याने रविवारचा प्रत्यक्षातील आकडा 48 होता.
जिल्हाधिकार्यांची कबुली
एक एप्रिलपासून शासनाचे पोर्टल अपलोड होत नव्हते. ते अपलोड झाल्याने शनिवार-रविवारच्या मृतांच्या आकड्यात 102 ची वाढ झाल्याचे दिसते; पण मनपाकडून माहिती घेतल्यावर रोज सरासरी सुमारे 40जणांचे मृत्यू नगरमध्ये होतात, अशी कबुली जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी व्हीडीओद्वारे दिली. त्यांनी सांगितलेला रोजचा 40चा आकडाही तसा कमी नाही. पालकमंत्री जिल्ह्याचा मृत्यूदर 1.11 टक्के असल्याचे सांगतात व देशाच्या आणि राज्याच्या तुलनेत कमी असल्याचाही दावा करतात; पण टक्केवारीच्या या आकडेवारीपेक्षा रोजचे 40जणांचे मृत्यू होणे, ही जिल्ह्याची अत्यंत गंभीर स्थिती दाखवणारी आकडेवारी आहे व त्यामुळेच तिच्याकडे पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील तीन मंत्र्यांसह सर्व आमदार व राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने पाहून जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण कमी कसे होईल, हे पाहण्याची गरज आहे.
मृत्यूच्या कारणांचा शोध गरजेचा
कोरोनाबाधितांवर होणारे उपचार मेडिकल प्रोटोकॉलनुसार होतात, की नाही तसेच मृत्यूचे कारण कोरोना आहे, की हृदयविकार, किडनी विकार वा अन्य काही; अचानक हे विकार कशामुळे बळावले, हेही यानिमित्ताने विशेष समिती नेमून तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना मृतांचे शवविच्छेदन होत नसल्याने कोरोना मृत्यू या लेबलखाली अंत्यसंस्कार होत आहेत; पण असे रोजचे जाणारे 40 बळी जिल्हावासीयांच्या मनात धडकी भरवणारे आहेत.
COMMENTS