‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी :  सुभाष देसाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी : सुभाष देसाई

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करतच आहे.

भारत व इजिप्तमध्ये संयुक्त लष्करी सराव
जळगाव जिल्ह्यातील जवानाला वीरमरण
अंबाजोगाईत अडखळत बोलणार्‍या मुलांच्या शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करतच आहे. याखेरीज मराठी भाषा मूळ स्वरुपात अभिजात कशी आहे, याची माहिती ग्रंथ किंवा प्रदर्शनाद्वारे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे तसेच विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीधर दीक्षित यांनी श्री.देसाई यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. 

मराठी माणसांना अभिजात मराठीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. परंतु ही अभिजात मराठी नेमकी कशी आहे, याची माहिती सर्वसामान्यांना मिळत नाही. ती विविध माध्यमांतून सर्वसामान्यांना उपलब्ध झाली पाहिजे. महाराष्ट्री प्राकृत ते मराठी अशा उत्क्रांती साखळीची सर्वांना ओळख झाली पाहिजे. विविध माध्यमांद्वारे मराठी भाषेचे मूळ जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे अशी सूचना श्री. देसाई यांनी केली बोली भाषेतील शब्द नव्या पिढीसाठी रुढ झाले पाहिजेत, यासाठी त्याचा वापर लेखन, पटकथा तसेच मालिकांमध्ये झाला पाहिजे, असेही देसाई म्हणाले. यावेळी दीक्षित यांनी विश्वकोष मंडळाची पुढील वाटचाल आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, विश्वकोषाचे काम ग्रामीण भागापर्यंत पोहचविले जाईल. ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यावर विशेष भर दिला जाईल. विश्वकोषातील माहिती नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली जाईल. पारंपरिक पद्धत आणि आधुनिक माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पुरविण्यात येईल. येत्या काळात २१ कोषांप्रमाणे कुमारकोष काढण्याचा मानस असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. खंड अद्ययावतीकरण, तपशील तपासणे, आक्षेपार्ह बाबींमध्ये दुरूस्ती करण्याचा मानस असल्याचेही दीक्षित यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष डॉ.मोरे यांनी त्यांच्या निवडीबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.

COMMENTS