कर्जत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने कर्जत- जामखेड मतदारसंघावर शोककळा पसरली असून, या परिसराने एक दूरदृष्टी लाभलेला, विकासाचा खंबीर पाठीराखा
कर्जत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने कर्जत- जामखेड मतदारसंघावर शोककळा पसरली असून, या परिसराने एक दूरदृष्टी लाभलेला, विकासाचा खंबीर पाठीराखा कायमचा गमावला आहे. कर्जत तालुक्याशी अजित पवार यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर ते जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि विकासाभिमुख होते. कर्जत तालुक्याच्या विकासामध्ये अतिशय मोठे योगदान अजित पवार यांचे राहिले आहे. बारामती सारखाच कर्जत तालुका व्हावा याची स्वप्न रोहित पवार यांनी जे पाहिले होते ते त्यांचे काका अजित पवार यांच्याच पाठिंब्यामुळे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना कर्जत जामखेड मतदार संघाला अजित पवार यांनी सर्वात जास्त निधी दिला असा आरोप त्यावेळी अजित पवार यांच्यावर झाला होता. मात्र या दुर्दैवी घटनेने या सर्व स्वप्नांना आता खीळ बसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील जगदंबा सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणींमुळे बंद पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना दूरवरच्या कारखान्यांकडे जावे लागत होते. ही परिस्थिती पाहून अजित पवार यांनी पुढाकार घेत जगदंबा कारखाना गोयंकांच्या नावावर खरेदी करून, त्या जागी अत्याधुनिक ‘अंबालिका साखर कारखाना’ उभारला.
या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला शाश्वत आणि न्याय्य दर मिळू लागला. इतकेच नव्हे, तर अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून शेतीपूरक उपक्रम, शेतकरी मेळावे, उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन असे विविध उपक्रम सातत्याने राबवले गेले. बारडगाव सुद्रिक परिसरात रस्त्यांचे मजबूत जाळे, तसेच कारखान्याशी संलग्न माध्यमिक विद्यालयासाठी भव्य इमारत उभारण्यात अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले.
कर्जत – जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या राजकीय वाटचालीत अजित पवार यांचे योगदान निर्णायक ठरले. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात रोहित पवार यांना यश मिळण्यात अजित पवार यांची रणनीती, अनुभव आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पवार कुटुंबीय वेगवेगळ्या पक्षांत असतानाही, अजित पवार यांनी मतदारसंघात थेट प्रचार न केल्याचा लाभ रोहित पवार यांना झाला आणि त्यांनी निसटत्या मतांनी विजय मिळवला. निकालानंतर काराडीतील प्रीतिसंगम येथे झालेली दोघांची भेट आणि “बेट्या, मी मतदारसंघात आलो नाही म्हणूनच तुझा विजय झाला” हे अजित पवार यांचे शब्द आज अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरत आहेत.
अजित पवार यांच्या निधनाने कर्जत– जामखेड मतदारसंघाने केवळ एक नेता नव्हे, तर विकासाचा ध्यास घेतलेला मार्गदर्शक गमावला आहे. ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

COMMENTS