देवळाली प्रवरा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी व इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ९) सकाळी १० वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अहिल्या

देवळाली प्रवरा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी व इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ९) सकाळी १० वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असे शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले. राहुरी येथे महसूल व पोलिस प्रशासनाला वरील निवेदन देण्यात आले, यावेळी मोरे बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, सचिन करपे, सुनील आढाव, सुनील इंगळे, सुभाष वने, सुधाकर कराळे, अशोक तनपुरे, अनिकेत कुलकर्णी, शिवराम कडू आदी उपस्थित होते. मोरे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. प्रत्यक्षात कर्जमाफी देतांना विविध अटी, निकष लावल्याने अवघ्या दहा टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. दोन लाखांची कर्जमाफी ठरवली. तेवढीच द्या. परंतु पात्र-अपात्रेचे अटी, निकष काढून टाका.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा. साखर कारखान्यांकडे एफआरपीची ऊस बिलांची रक्कम थकीत आहे. ही थकीत ऊस बिले ताबडतोब मिळावीत. कृषी पंपांसाठी दिवसा किमान आठ तास अखंडित वीज पुरवठा करावा. शेतीमालाला हमीभाव आणि योग्य बाजारभाव मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मार्केटिंग फेडरेशनतर्फे कांदा खरेदी २५०० रुपये क्विंटल दराने करावी. अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ९) रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असे मोरे यांनी सांगितले.

COMMENTS