देवळाली प्रवरा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी आणि मर्यादित लाभाच्या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने देवळाली प

देवळाली प्रवरा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी आणि मर्यादित लाभाच्या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा येथील छत्रपती चौकात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी आधीच शेतीमालाला मिळत नसलेला भाव, वाढते उत्पादन खर्च आणि आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण कर्जमुक्तीची अपेक्षा असताना शासनाने जाहीर केलेल्या योजनेत अनेक जाचक अटी घालून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे.
शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जासाठी कर्जमुक्ती लागू करण्यात आली आहे. मात्र, २ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम स्वतः भरावी लागणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कठोर अटींमुळे लाभ मिळणे कठीण झाले आहे.
याशिवाय, यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो रुपयांचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणारआहे. या वेळी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष अमोल मोढे-पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील व उपाध्यक्ष अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्यात येणार आहे.
आंदोलनात जनुकाका शेटे, संजय काळे, साई सांगळे, प्रदीप सांगळे, सोन्याबापू मोरे, अरुण भांड, संदीप वाबळे, रितेश शिंदे, एकनाथ जंगले, वसंत थिटे, मच्छिंद्र भांड, दीपक सांगळे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानदेव शेटे, बाळासाहेब खांदे, सुधीर खांदे, गंगाधर खांदे, ठकसेन गायेगाये, राहुल मोरे, अशोक भांड, पांडुरंग शेटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS