Homeताज्या बातम्या

पंधरा वर्षांपासून पुलाचे काम अपूर्ण  धोकादायक रस्ता व पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; भोसे ग्रामस्थांचे उपोषण

 कर्जत : तालुक्यातील भोसे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील कुकडी प्रकल्पाच्या बोगद्यावरील पूल गेल्या पंधरा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिका

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
आकाशवाणी@90 उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात  


 कर्जत : तालुक्यातील भोसे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील कुकडी प्रकल्पाच्या बोगद्यावरील पूल गेल्या पंधरा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. धोकादायक पूल व रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. तहसीलदार रवी सत्वन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
उपोषणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख अक्षय खराडे, आप्पा शिरसागर, अमोल खराडे, सोमनाथ शिंदे, सुभाष खराडे, शहाजी खराडे, संदीप खराडे यांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना अक्षय खराडे म्हणाले की, भोसे (ता. कर्जत) गावाकडे जाणाऱ्या मार्गावर कुकडी प्रकल्पाचे पाणी सीना धरणात पोहोचविण्यासाठी सुमारे १४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या बोगद्यावरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बोगद्याच्या दोन्ही बाजूंचे कठडे पूर्णपणे तुटले असून वाहनधारकांना सुमारे दोन किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था, मोठे खड्डे, वाहतुकीची गैरसोय आणि वाढते अपघात यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. २००९ मध्ये एका नागरिकाचा बोगद्याचा अंदाज न आल्याने अपघातात मृत्यू झाला आहे. भविष्यातही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून आणखी किती नागरिकांचा जीव गमावल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे असा अक्षय खराडे यांनी उपस्थित केला.
 यावेळी बोलताना आप्पा क्षीरसागर म्हणाले की, बोगद्यावरील पुलाचे काम तातडीने मंजूर करून पूर्ण करावे, पीरफाटा ते भोसे गावाकडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा, येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी कामास सुरुवात करावी तसेच सरकारी रस्त्याला अधिकृत मंजुरी द्यावी.
 उपोषणाची दखल घेत तहसीलदार रवी सत्वन  व पाटबंधारे विभागाच्या अधिकारी   शर्मा यांनी  आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.  

COMMENTS