पुणे : जिल्ह्यातील तुळापूर येथे झालेल्या कथित मनोरंजन मेळाव्यावरील पोलिस कारवाईनंतर या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाह

पुणे : जिल्ह्यातील तुळापूर येथे झालेल्या कथित मनोरंजन मेळाव्यावरील पोलिस कारवाईनंतर या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या कारवाईतील काही मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली आहे.
सामाजिक माध्यमावरील आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी या कार्यक्रमाचे स्वरूप नेमके काय होते, याबाबत शंका व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी असलेल्या कार्यक्रमाला नेमके कोणत्या निकषांवरून ‘खासगी समारंभ’ म्हणून संबोधले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींशी निगडित ऐतिहासिक आणि भावनिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. अशा परिसरात मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन कार्यक्रम आयोजित झाल्याच्या वृत्तांबाबत अंधारे यांनी चिंता व्यक्त केली. या घटनेची सर्वंकष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली. अंधारे यांनी पोलिसांच्या कारवाईतील आकडेवारीकडे लक्ष वेधले आहे. उपलब्ध माहितीनुसार कार्यक्रमस्थळी सुमारे 154 जण उपस्थित होते. मात्र गुन्हा केवळ 78 जणांविरुद्ध नोंदविण्यात आल्याचे समोर आले आहे. उर्वरित व्यक्तींवर कारवाई का करण्यात आली नाही, याबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर कारवाई सर्वांवर समान निकषांनुसार झाली का, असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत तपास यंत्रणांनी सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणात उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात आली का, याबाबतही अंधारे यांनी शंका व्यक्त केली. उपलब्ध माहितीनुसार केवळ 29 जणांचीच वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जर बेकायदेशीर पदार्थांच्या सेवनाचा संशय होता, तर सर्व उपस्थितांची तपासणी का करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS