कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेससमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे सम

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेससमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली असून, लोकसभेतील 28 खासदारांपैकी तब्बल 20 खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा पक्षाच्या माजी नेत्या काकोली घोष यांनी केला आहे. या घडामोडीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
काकोली घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित खासदारांनी आपली भूमिका लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पत्र पाठविले आहे. या पत्रात स्वतंत्र भूमिका मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली, तरी दिल्लीतील बैठका आणि वाढती नाराजी यामुळे या दाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवारी दुपारी दिल्लीत काही खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तृणमूल काँग्रेसमधील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशीही संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला काकोली घोष, शताब्दी रॉय, अबू ताहिर, अरूप चक्रवर्ती, खलीलुर रहमान, शर्मिला सरकार, असित मल, कालीपदा सोरेन, जगदीश बसुनिया आणि प्रसून बॅनर्जी यांच्यासह अनेक खासदार उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा आणि राज्यसभा मिळून तृणमूल काँग्रेसकडे मोठे संख्याबळ आहे. मात्र यापूर्वी राज्यातील अनेक आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची घटना घडली होती. त्यामुळे पक्षातील असंतोष केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित नसून संघटनात्मक पातळीवर वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रविवारी रात्री दिल्लीतील एका ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या सुमारे 20 खासदारांची अनौपचारिक बैठक झाली होती. या बैठकीत पक्षाच्या नेतृत्वशैलीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. सोमवारी या बैठकीचे एक छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. या छायाचित्रात अनेक खासदार एका टेबलाभोवती चर्चा करताना दिसत होते. हे छायाचित्र बाहेर कसे आले यावरून पक्षांतर्गत वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
सुखेंदू शेखर राय यांचा राजीनामा
या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक धक्का पक्षाला बसला तो राज्यसभेतील ज्येष्ठ सदस्य सुखेंदू शेखर राय यांच्या राजीनाम्यामुळे. त्यांनी राज्यसभा सदस्यत्वासह पक्षाचाही राजीनामा देत नेतृत्वावर गंभीर आरोप केले. राजीनामा पत्रात त्यांनी पक्षाच्या निवडणूक पराभवासाठी दीर्घकाळ चाललेल्या कथित गैरव्यवस्था आणि जनतेपासून वाढलेले अंतर कारणीभूत असल्याचे नमूद केले. त्यांनी पक्षातील निर्णय प्रक्रिया काही व्यक्तींपुरती मर्यादित राहिल्याचा आरोपही केला. सुखेंदू शेखर राय यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची मते दुर्लक्षित करण्यात आली. कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्याशी संपर्क कमी होत गेला. निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाने आत्मपरीक्षण करण्याऐवजी वास्तवाकडे दुर्लक्ष केले, अशी टीकाही त्यांनी केली.

COMMENTS